नाशिक : दारणा नदी कोरडी; भगूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
नाशिक : दारणा नदी कोरडी; भगूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकच्या भगूर शहरातील दारणा नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने शहराचा पाणीपुरवठा नियोजन कोलमडले असून, तांत्रिक अडचणींमुळे पुढील तीन ते चार दिवस नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांनी नागरिकांना पाणी जपून व केवळ गरजेपुरते वापरण्याचे आवाहन केले आहे. नळ उघडे ठेवणे, वाहन धुणे तसेच पाण्याची नासाडी टाळावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भगूर नगरपरिषदेची पाणीपुरवठा यंत्रणा जुनी व कालबाह्य झाल्याने सध्या २५ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. कोणत्याही अडचणी निर्माण न झाल्यास पुढील वर्षापासून शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सध्या जुनाट यंत्रणेवर अतिरिक्त खर्च टाळत उपलब्ध साधनसामग्रीतून योग्य नियोजन करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दारणा नदी कोरडी पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, अन्यथा परिस्थिती हाताळणे कठीण होईल, अशी विनंती उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक विशाल बलकवडे व नगरसेविका अश्विनी भवार यांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group