Ashok Kharat : प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल, खरात प्रकरणात चौकशीला वेग; मोठी माहिती समोर येणार ?
Ashok Kharat : प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल, खरात प्रकरणात चौकशीला वेग; मोठी माहिती समोर येणार ?
img
वैष्णवी सांगळे
महिलांचे शोषण आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील चौकशीला वेग आला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय ? 
भोंदूबाबा अशोक खरात विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांना 'समता पतसंस्थेत' खरातशी संबंधित अशी 132 संशयास्पद खाती आढळली आहेत, ज्यामध्ये खरात हा 'नॉमिनी' (वारसदार) आहे. विशेष म्हणजे, यातील 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे आहेत.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 खाती आहेत. त्यांच्या मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या चारही खात्यांवरून एकूण 2 कोटी 40 लाख रुपयांचे मोठे व्यवहार झाले आहेत. या पैशांचा स्रोत काय? हे पैसे खरातच्या सावकारी व्यवसायाशी संबंधित आहेत का? आणि या व्यवहारांमागे भोंदू खरातचा नेमका हेतू काय होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी अशोक खरातशी असलेल्या संबंधांच्या आरोपावरून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या सख्ख्या बहिणीचीच पोलीस चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्त्यांवर नोटीस धाडली होती, त्यानंतर त्या आज चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group