मोठी बातमी !  त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक; 'हे' आहे कारण
मोठी बातमी ! त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक; 'हे' आहे कारण
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिरात देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी रात्री उशिरा मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचा विश्‍वस्त पुरुषोत्तम कडलग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्‍वर मंदिरात ’व्हीआयपी’ दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. दि. 11 एप्रिल रोजी नाशिकच्या पंचवटी भागातील भाविक मित्रांसह दर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वरला गेले होते. त्यांनी 200 रुपयांचा अधिकृत देणगी पास घेतला होता, मात्र रांगेत उभे असताना कडलगने त्यांना गाठले.

रांगेतून दर्शनाला 4-5 तास लागतील, आम्ही 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो, असे आमिष दाखवून त्याने एका भाविकाकडून 3 हजार, तर इतर दोन भाविकांकडून प्रत्येकी 2 हजार रुपये रोख स्वीकारले. याप्रकरणी एका भाविकाने त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला, त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सर्वात आधी गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गोटीरामला तत्काळ अटक करण्यात आली, तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे. तपासादरम्यान या संपूर्ण रॅकेटमध्ये विश्‍वस्त पुरुषोत्तम कडलगचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले, यानंतर रात्री उशिरा पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आली.

त्र्यंबकेश्‍वर याठिकाणी देशविदेशातून भाविक येतात. 200 रुपये व्हिआयपी दर्शनासाठी ट्रस्टची फी आहे. त्यात तत्काळ दर्शन व्हावे यासाठी काही एजंट काम करत होते. 3 हजार ते 12 हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मंदिर समितीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळाले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पूर्व दरवाजातून ट्रस्टच्या अधिकाराचा वापर करून पैसे घेतलेल्या भाविकांना सोडले जात होते. आणखी काही ट्रस्टी असतील तर चौकशी केली जाईल. तुम्हाला 3 ते 4 तास लागतील, 10 मिनिटात दर्शन हवे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगितले जात होते. 100 ते 150 लोक सोडले जात होते. कोणाच्या माध्यमातून या लोकांना सोडले याचा देखील तपास सुरू आहे. विश्‍वस्तांचे 2 नातेवाईक आणि 1 एजंट अटकेत आहे. या व्यतिरिक्त काही लोक आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. ज्यांनी विश्‍वस्तपदाचा गैरवापर केला, त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे. जे पुरावे आहेत ते न्यायालयासमोर ठेवले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, भाविकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group