नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- महिलांवरील अत्याचार आणि छळ प्रकरणांबाबत कठोर भूमिका घेत भाजप नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांनी अशोक खरात प्रकरणी ठाम इशारा देत, “महिलांवर अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही, खरात याला ठेचण्याचे काम सुरू आहे,” असे स्पष्ट केले. नाशिकरोड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची कुणकुण तीन महिन्यांपूर्वीच लागली होती. त्यानंतर पुरावे समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. एखाद्याला पकडणे सोपे असते, मात्र त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड असते, असे सांगत त्यांनी तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त केला. खरात यांच्या मागे ईडी, एसआयटी, सीबीआय यांसारख्या यंत्रणा लागल्या असून रोज नवे तपशील समोर येत आहेत.
ज्या महिलांवर अन्याय झाला आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, त्यांना न्याय मिळवून देण्याचा पाठपुरावा केला जाईल, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला छळाच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सांगितले. टीसीएससारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही तक्रारींना योग्य प्रतिसाद मिळत नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांना नाईलाजाने छळ सहन करावा लागतो, व्हॉट्सॲप चॅटिंगपासून ते कार्यालयीन सहलींपर्यंत अनेक स्तरांवर त्रास दिला जातो, असे त्या म्हणाल्या.
पॉश कायद्यात बदल करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी भरारी पथकांची स्थापन करण्याची मागणी केली. ९० दिवसांत न्याय न मिळाल्यास संबंधितांवर दंडाची तरतूद असावी, तसेच या प्रकरणांची दखल सरकारी स्तरावर घेतली जावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी कठोर कारवाईची भूमिका घेत त्याच्या घरावर “१०० टक्के बुलडोझर चालला पाहिजे,” असे स्पष्ट केले. संबंधित आरोपींना वाचवले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणाचा तपास अधिकारी तेजस्वी सातपुते करत असून येत्या काळात ठोस निष्कर्ष समोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिला आयोगाच्या रिक्त पदाबाबत त्यांनी सांगितले की, पद रिक्त असले तरी अधिकारी काम करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असून लवकरच हे पद भरले जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिला आरक्षण विधेयकावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत हा महिलांसाठी दुःखद दिवस असल्याचे म्हटले. २७ वर्षांच्या संघर्षानंतर महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार होते, मात्र काही घटकांनी विरोध केल्याने महिलांचा हक्क हिरावला गेला, असा आरोप त्यांनी केला. यापुढे महिलांच्या सशक्तीकरणासाठी थेट लढा दिला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
एकूणच, महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत चित्रा वाघ यांनी अशोक खरात प्रकरणासह सर्वच संबंधित मुद्द्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे उपस्थित होत्या.