नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव असलेली 20 टक्के घरे व जमिनी म्हाडाकडे वर्ग न करता, सरकारची फसवणूक केल्याचा आरोप शहरातील नामांकित बिल्डरांवर करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
नियमानुसार, 4 हजार चौरस मीटर (सुमारे 1 एकर) पेक्षा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये 20 टक्के जागा किंवा घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव ठेवणे बंधनकारक असते. ही जागा म्हाडाकडे वर्ग करणे आवश्यक असते. मात्र, नाशिकमधील अनेक विकासकांनी प्रकल्पाचे क्षेत्र कागदोपत्री कमी दाखवून किंवा इतर पळवाटा शोधून ही घरे सरकारला दिलीच नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणात तब्बल १९४ विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणामध्ये अनेक बड्या बिल्डरांचा समावेश आहे. त्यानंतर आता म्हाडा आरक्षणाच्या अंमलबजावणीत झालेल्या कथित अनियमिततेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे नाशिकमधील बांधकाम क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत.
या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती (SIT) स्थापन केली आहे. या समितीमध्ये विभागीय आयुक्त, नाशिक – अध्यक्ष, जमावबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे- सदस्य, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे-सदस्य, पोलिस आयुक्त, नाशिक -सदस्य, संचालक, नगर रचना व नियोजन, महाराष्ट्र राज्य, पुणे.-सदस्य, उपसंचालक भूमि अभिलेख, नाशिक विभाग, नाशिक- सदस्य सचिव यांचा समावेश आहे.
या उच्चस्तरीय समितीला संपूर्ण चौकशी करून एका महिन्याच्या आत आपला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक नामांकित आणि 'बड्या' बिल्डरांची नावे या घोटाळ्यात समोर येण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष या चौकशीकडे लागले आहे.