नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार करून आदिवासी असल्याचे कारण दाखवून लग्नास नकार देणार्या प्रियकरासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी तरुणी ही कोकणी आदिवासी असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी शुभम् प्रकाश तांबे (रा. अर्णमय सोसायटी, जनकनगरी, कामटवाडा) याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे उकळून लग्नाचे आमिष दाखवून जून 2021 ते 17 एप्रिल 2026 या कालावधीत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
ही बाब प्रियकर शुभम् तांबेच्या घरी समजताच त्याचा भाऊ वैभव प्रकाश तांबे, सुनीता प्रकाश तांबे, केतन प्रकाश तांबे व प्रकाश तांबे (सर्व रा. अर्णमय सोसायटी, जनकनगरी, कामटवाडा) यांनी संगनमत करून पीडिता ही आदिवासी समाजाची असल्याने त्यांच्या मुलाशी तिचे लग्न करण्यास नकार दिला व तिला जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त बारी करीत आहेत.