नाशिकमधील नामांकित कंपनीतील धर्मांतर प्रकरणाने सर्वांचा हादरवून सोडले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे. तिचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान अटक पूर्व जामिनासाठी तिचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.
आता कंपनीतील काही महिला कर्मचारी पुढे येऊन बोलत आहेत. त्यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. कंपनीतील टीम लीडर त्यांच्या डेस्कचा वापर कामासाठी नव्हे तर महिला कर्मचाऱ्यांना मानसिक आणि नैतिक मुल्यांवरुन त्रास देण्यासाठी वापरायचे. टीम लीडर जेव्हा बोलवायचे तेव्हा ते महिलांसोबत अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायचे असं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.
“सर्व आरोपींची खासकरुन त्यांची बोलण्याची पद्धत अत्यंत घाणेरडी होती. मुलींना टीम लीडरच्या डेस्कवर बोलवायचे व तिथे अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायचे. कुठल्याही व्यावसायिक कार्यालयात अशा पद्धतीने बोललं जात नाही” असं एका माजी कर्मचाऱ्याने सांगितलं. एका माजी महिला कर्मचाऱ्याने दोन स्टाफ मेंबरची नाव सांगितली. “दानिश आणि रझा. ते ऑफिसमधूनच वीकेंडसाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट बुक करायचे आणि तिथे येण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकायचे. तिथलं वातावरण खूपच विषारी होतं. कंपनी सोडल्यानंतर आता बरं वाटतय” असं तिने सांगितलं.या प्रकरणातील तपासाठी विशेष तपास पथक SIT ची स्थापना करण्यात आली आहे.