माजी सैनिकाची १० लाखांची फसवणूक;
माजी सैनिकाची १० लाखांची फसवणूक; "या" नगरसेवकांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
img
Chandrakant Barve



नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- देशसेवा करून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाला हक्काच्या घरासाठी प्लॉट देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे महापालिकेतील गटनेते केशव पोरजे, विशाल मालुजंकर आणि गणेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार शिवराम बारी (५२, रा. जय भवानी रोड) हे भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाले आहेत. २०१५ मध्ये ते आर्टिलरी सेंटर येथे कार्यरत असताना त्यांची ओळख गणेश बबन जाधव याच्याशी झाली होती.

जाधव याने वडनेर शिवारातील सर्वे क्र. २३९/१ मधील २ आरचा प्लॉट विक्री करायचा असल्याचे बारी यांना सांगितले. सेवानिवृत्तीनंतर नाशिकमध्येच स्थायिक व्हायचे असल्याने बारी यांनी २ लाख २० हजार रुपयांत हा व्यवहार निश्चित केला आणि वेळोवेळी रक्कम अदा केली.

प्लॉटचा ताबा मागितला असता, जागा 'ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून ती 'एनए' (बिगरशेती) करून देण्याचे आमिष जाधवने दाखवले. यासाठी बारी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ७ लाख ५० हजार रुपये जादा उकळण्यात आले. मात्र, तीन वर्षे उलटूनही प्लॉट मिळाला नाही की एनए झाला नाही. जेव्हा बारी यांनी पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा जाधवने दिलेले चेक बाऊन्स झाले.

नगरसेवकाची मध्यस्थी अन् धमकी 

या वादात स्थानिक नगरसेवक केशव पोरजे यांनी मध्यस्थी केली. "या व्यवहारात माझा शालक विशाल मालुजंकर हा भागीदार आहे," असे सांगून त्यांनी बारी यांना धक्का दिला. पोरजे यांनी जाधव आणि मालुजंकर यांच्याकडे सध्या पैसे नसल्याचे सांगत, व्यवहार मिटवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही हक्काचे पैसे आणि जमीन मिळत नसल्याने अखेर माजी सैनिक अनिलकुमार बारी यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांची कारवाई माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गणेश जाधव, विशाल मालुजंकर आणि केशव पोरजे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतच्या व्यवहाराचा विषय स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने माझ्याकडे आल्यानंतर मी त्याची मध्यस्थी केली. मध्यस्थी झाल्यानंतर व्यवहार पूर्ण झाला का नाही, याची मला माहिती नाही. या आर्थिक व्यवहाराशी माझा कोणताही संबंध अगर देणे घेणे नाही, असे नगरसेवक केशव पोरजे यांनी सांगितले.       
इतर बातम्या
Join Whatsapp Group