नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - नदीजोड प्रकल्पाचे कंत्राट मिळाल्याचे व त्यासाठी स्टीलचे मटेरियल घ्यायचे असल्याचे सांगून ते मटेरियल भंगार व्यापार्याला परस्पर देऊन एका व्यापार्याची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कुणाल सदाशिव वडजे (रा. अमृतानगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हे स्टील विक्रीचे व्यापारी आहेत. आरोपी ठेकेदार प्रज्वल राजेंद्र बोरस्ते (रा. साकोरे मिग, ता. निफाड), शेती व्यावसायिक राहुल शिवाजी ढोमसे (रा. गोरठाण, ता. निफाड) व भंगार विक्रेता इनायत इबादत हुसेन (रा. रॉयल कॉम्प्लेक्स, भाभानगर, नाशिक) या तिघांनी फिर्यादीची अंबड एमआयडीसीतील इंदुमती स्टील या कंपनीत भेट घेतली. त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नारपार या नदीजोड प्रकल्पाचे कंत्राट मिळाल्याचे खोटे सांगून त्यासाठी स्टीलचे मटेरियल हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी 53 लाख 15 हजार 181 रुपयांचा स्ट्रक्चरल स्टीलचा माल घेतला. त्यापोटी फिर्यादी वडजे यांना फक्त 13 लाख रुपये दिले.
या आरोपींनी संगनमत करून स्वत:च्या आर्थिक लाभाकरिता हा माल स्टील विक्रेता इनायत इबादत हुसेन या भंगार व्यावसायिकाला दिला. त्यानंतर या तिघांनी मिळून फिर्यादीची 40 लाख 15 हजार 181 रुपयांची आर्थिक फसवणूक केली व विश्वासघात करून धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडे करीत आहेत.