आणखी किती बळी घेणार? दिंडोरीत हायव्होल्टेज तारेमुळे तरुणाचा मृत्यू; विद्युत तारा भूमिगत करण्याची नागरिकांची आक्रमक मागणी
आणखी किती बळी घेणार? दिंडोरीत हायव्होल्टेज तारेमुळे तरुणाचा मृत्यू; विद्युत तारा भूमिगत करण्याची नागरिकांची आक्रमक मागणी
img
नितीशा कुलकर्णी






नाशिकच्या दिंडोरी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घराच्या छतावरील टाकीची साफसफाई करताना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या (१३२ KV) संपर्कात आल्याने ४५ वर्षीय हरी पुंजा गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वाऱ्यामुळे झुलणाऱ्या मृत्यूच्या तारांनी एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला असून, या घटनेमुळे संपूर्ण गांधीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

विजेचा धक्का इतका भीषण होता की, हरिभाऊ थेट भिंतीवर आदळले आणि छतावरून खाली कोसळले. या थरारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी वीज कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढले असून, टॉवर गल्लीतील या जीवघेण्या तारांचे जाळे तातडीने भूमिगत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. "आणखी किती बळी घेणार?" असा संतप्त सवाल विचारत परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले  असून वीज कंपनीने तातडीने विद्युत तारांच्या भोवती प्लास्टिक आवरण बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दिंडोरी गांधीनगर येथे विद्युत तारांचे प्रचंड जाळे आहे. परवापासून वातावरणात बदल झाला असून हवा वाहत आहे.

थोड्याफार प्रमाणात वादळ पण निर्माण होत असून आज (सोमवार) सकाळपासून वारा वाहत असल्याने तारा सुद्धा हलत होत्या. दिंडोरीतील टॉवर गल्ली येथे हरी पुंजा गायकवाड (वय ४५) हे घराच्या टाकीवर साफसफाई करण्यासाठी तेथे काम करीत होते. त्या टाक्यांवरून व घरावरून १३२ केवीचा विद्युत तारांचा प्रवाह गेलेला आहे. हवा असल्याने तारा झुलत होत्या, याच तारांच्या प्रभावात आल्याने हरिभाऊ घराच्या छतावरून खाली पडले मृत्यू पावले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विद्युत प्रवाह व तरंगांचा प्रभाव इतका भयानक होता की ते भिंतीवर आदळले. दरम्यान, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात  गायकवाड यांना तपासणीसाठी आणले असता डॉ. काळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिस हवालदार प्रवीण शिंदे यांनी पंचनामा केला. तर वीज कंपनीचे शाखा अभियंता नागरे व महेंद्र पैठने यांनी प्रत्यक्ष येऊन तारांची पाहणी केली व मयत हरिभाऊ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. गांधीनगर येथील सर्व विद्युत तारांचे जाळे हे भूमिगत करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक नितीन गांगुर्डे ,अरुण गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group