'तो’ शेवटचा फोटो ठरला आयुष्याचा अखेरचा क्षण; चेहडी डॅम पुलावरून घसरून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
'तो’ शेवटचा फोटो ठरला आयुष्याचा अखेरचा क्षण; चेहडी डॅम पुलावरून घसरून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
img
Chandrakant Barve



नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक रोड बीटमधील चेहडी डॅम परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत, मोबाईलमध्ये टिपलेला एक फोटोच गीता दास यांचा आयुष्यातील शेवटचा ठरला आहे.

आनंदाचा क्षण जपण्यासाठी घेतलेला हा फोटो आता त्यांच्या आठवणींचा अखेरचा ठेवा बनला असून, या घटनेने परिसरासह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गीता रंजन दास (वय ५२, रा. साई अश्विनी अपार्टमेंट, सिद्धार्थ नगर, ता. शिर्डी, जि. अहिल्यानगर) या १ मे रोजी सकाळी नाशिक रोड बीटमधील चेहडी डॅमवरील पुलावर निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणचे सौंदर्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी त्या फोटो काढत असतानाच अचानक त्यांचा तोल गेला. पाय घसरल्याने त्या थेट पुलावरून खाली पाण्यात कोसळल्या.

घटनेनंतर क्षणातच परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यांच्या पती रंजन अर्जुन दास यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढले. गंभीर अवस्थेत त्यांना नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

एक साधा, आनंदी क्षण टिपण्याच्या प्रयत्नात घडलेली ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी ठरली आहे. ‘तो’ शेवटचा फोटो आता त्यांच्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी आयुष्यभराची आठवण बनून राहणार आहे. या घटनेमुळे नाशिक रोड बीट परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group