नाशिक रोड ( चंद्रकांत बर्वे ):- जिवंतपणी मृत्यूचा थरार काय असतो, याचा प्रत्यय मंगळवारी नाशिकरोडच्या स्टार मॉल परिसरात आला.
बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे धुराचे काळेकुट्ट लोट थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले आणि तिथे काचेच्या पेटीत असलेल्या सात नवजात बालकांचा श्वास गुदमरू लागला. मात्र, अशा आणीबाणीच्या प्रसंगी महापालिकेच्या हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयाने त्यांना योग्य उपचार देऊन , या चिमुरड्यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.
मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास स्टार मॉलच्या बेसमेंटमध्ये उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारील वाहनेही भक्ष्यस्थानी पडली. आगीपेक्षाही भयावह होता तो धूर! वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण इमारतीत अंधार पसरला आणि गुदमरलेल्या रुग्णांची वाचवा-वाचवा म्हणून धावपळ सुरू झाली.
सर्वात भीषण परिस्थिती तिसऱ्या मजल्यावरील बालरुग्णालयात होती. तिथे सात नवजात बालके अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. बाहेर धुराचे साम्राज्य आणि आत ऑक्सिजनच्या आधारावर जगणारी ही चिमुकली मुले... पालकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. धुरामुळे या बालकांच्या श्वासाची गती वाढली होती, जणू त्यांचे कोवळे प्राण कंठाशी आले होते.
अशा परिस्थितीत बिटको रुग्णालयाचे दरवाजे आशेचा किरण बनून उघडले. तातडीने या सातही बालकांना बिटकोत हलवण्यात आले. तिथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे आणि सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. कंचन लोकवाणी,डॉ. तेजस्विनी अंभोरे या महिला डॉक्टरांच्या पथकाने युध्दपातळीवर सूत्रे हाती घेतली. अपुरे मनुष्यबळ असतानाही या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या सातही बालकांवर उपचार सुरू केले.
"एकही जीव जाता कामा नये," याच जिद्दीने बिटकोचा पूर्ण स्टाफ रात्रभर झटत होता. पालकांच्या डोळ्यातील भीती पुसून तिथे विश्वासाचे नाते निर्माण करण्यात बिटको प्रशासनाला यश आले. बुधवारी सकाळी या बालकांना मूळ रुग्णालयात पाठवण्यात आले.
नाशिकरोड व पंचक्रोशीत करिता बिटको रुग्णालय नेहमीच आधारवड राहिले आहे. या आगीच्या घटनेत दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता पाहता, बिटकोने आपली 'मिनी सिव्हिल हॉस्पिटल' ही ओळख पुन्हा एकदा सार्थ ठरवली आहे. आगीच्या तांडवातून सुटलेल्या त्या सात जीवांना आज बिटकोच्या रूपाने नवा श्वास मिळाला आहे.