सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
img
Chandrakant Barve



नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड जेलरोड परिसरातील दसकगाव येथे सासरच्या सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका ४० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आशा प्रवीण घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील गणेश गोपाळराव वाळके यांची बहीण आशा हिचा विवाह २००८ मध्ये दसकगाव येथील प्रवीण साहेबराव घोटेकर याच्याशी झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असताना काही वर्षांनंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. २०१८ मध्ये चारचाकी वाहन व फ्लॅट घेण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. बहिणीचा संसार टिकावा या हेतूने गणेश वाळके यांनी आपल्या आईच्या नावावरील जमीन विकून ही रक्कम दिली होती.

मात्र त्यानंतरही छळ कमी न होता उलट वाढत गेला. आईच्या निधनानंतर वारसा हक्कावरून आशा हिला मारहाण करण्यात आली तसेच तिचे सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने सासरच्यांनी काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय पती प्रवीण घोटेकर याचे आरती नयन गोसावी नामक महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप असून, याबाबत जाब विचारल्यावर तिलाच धमकावण्यात येत होते. सासू, सासरे व दिराने तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली, तर “जादूटोण्याच्या साहाय्याने तुला मारून टाकू” अशीही भीती दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी (६ मे) सकाळी सुमारे ७ वाजता आशा दरवाजा उघडत नसल्याने तिच्या भावाला फोन करण्यात आला. कुटुंबीय नाशिकला पोहोचण्यापूर्वीच बिटको रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घरातील सततच्या छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रवीण साहेबराव घोटेकर (पती), साहेबराव सावळीराम घोटेकर, लताबाई साहेबराव घोटेकर, राजेंद्र साहेबराव घोटेकर, चित्रा राजेंद्र घोटेकर आणि आरती नयन गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group