नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विविध शासकीय विभागांमध्ये कोट्यामधून व शिफारशींद्वारे कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून तीन जणांनी 98 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी राजेश भारती, शंभूराजे देशमुख ऊर्फ सचिन हंबीरराव पाटील व राजेश भारती याची पत्नी स्वाती भारती यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांवरून व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मेलद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादीचा भाचा, तसेच त्यांच्या ओळखीचे नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार यांना गाठले, तसेच या बेरोजगार युवकांना विविध मेलद्वारे विविध शासकीय विभागांचे नियुक्तिपत्र (शासकीय विभागाचे नाव, लोगो, त्या त्या विभागांतील संबंधित वरिष्ठ अधिकार्यांच्या स्वाक्षर्या व शिक्के) असे पाठवून त्यांना शासकीय विभागात कोट्यामधून व शिफारशीद्वारे कायमस्वरूपी नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवितो.
त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने 97 लाख 79 हजार रुपये इतकी रक्कम आरोपींच्या नावे असलेल्या क्यूआर कोड व इतर बँक खात्यांवर स्वीकारली. त्यानंतर उमेदवारांना बनावट शासकीय मेलद्वारे बनावट शासकीय दस्तऐवज बनवून त्यावर शासकीय विभागाचे नाव, लोगो, त्या त्या विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकार्यांच्या स्वाक्षर्या व शिक्के वापरून फिर्यादीसह बेरोजगार उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार जून 2025 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे घडला.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.