नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील एका प्रसिद्ध रुग्णालयात परिचारिका (नर्स)म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय तरुणीने रुग्णालयाच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी दुपारी उघडकीस आली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तन्वी नाना भदाणे (वय २२, रा. कळवण) ही तरुणी गेल्या दीड वर्षांपासून नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. रुग्णालय प्रशासनाकडून वरच्या मजल्यावर परिचारिकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी दोन ते आठ या वेळेत काम आटोपून ती आपल्या रूममध्ये गेली होती.
शनिवारी दुपारच्या सुमारास तिच्या सहकारी परिचारिकांनी दार उघडून पाहिले असता तन्वी ही पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच सहकाऱ्यांनी एकच आरडाओरड करत तातडीने तिला खाली उतरवले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
मूळ कळवण येथील असलेल्या तन्वीच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार असून घरची परिस्थिती हलाखीची असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.