खरात प्रकरण ताजे असतानाच आणखी एका भोंदूबाबावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
खरात प्रकरण ताजे असतानाच आणखी एका भोंदूबाबावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
img
दैनिक भ्रमर



लासलगाव (भ्रमर वार्ताहर) :- करणीबाधेची भीती दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार करणार्‍या भोंदूबाबावर अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील या भयंकर प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नाशिकची रहिवासी असून ती एका खासगी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करते. मागील काही दिवसांपासून कौटुंबिक अडचणी आणि मानसिक त्रासामुळे ती त्रस्त होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी तिच्या पालकांनी तिला धारणगाव खडक येथील एका मंदिरात नेले होते.

याच मंदिरात महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदू बाबाने तिला गाठले.  तुझ्यावर करणीबाधा झाली आहे, असे सांगून त्याने पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले. याच भीतीचा आणि त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्याने उपचारांच्या नावाखाली या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने पीडितेवर शारीरिक अत्याचार केले तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.

या भयंकर प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर, याची दखल घेत लासलगाव पोलिसांनी आरोपी महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने अखेर धाडस दाखवत संपूर्ण प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दिली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

भोंदूबाबाच्या भूलथापांना बळी न पडता अंधश्रद्धेपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, या बाबाकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता पुढे येऊन लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही  तपास पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी केले आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group