नाशिक : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलेच्या लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरण राज्यभर चर्चेत असतानाच शहरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजिर इनामदार याने गळ्यातील तुळशी माळ व हातातील धागे काढून धार्मिक प्रथांबाबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी तंजिर इनामदार आणि पीडिता हे दोघे पुणे विद्यार्थी गृहाच्या एस.एस. धामणकर कॉलेज मध्ये शिकतात.
संशयित तंजिर हा तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जून २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तिचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले आणि त्याद्वारे तिला धमकावले. तसेच तिला सिगारेट पिण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे.
जानेवारी २०२६ मध्ये आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला एका लॉजमध्ये नेले. तिथे तिला मद्य पिण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच तिच्या गळ्यातील तुळशी माळ व हातातील धागे काढून धार्मिक प्रथांबाबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणानंतर हिंदू संघटना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या तपासात आणखी काय बाबी उघड होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.