"माझ्या आईला मारून टाकलं रे!" नाशिकमधील 'त्या' भीषण अपघातानंतर मुलाचा हृदयद्रावक टाहो
img
नितीशा कुलकर्णी





नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कॉलेजमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. ज्यात एक तरुण 'माझ्या आईला मारून टाकलं रे' असं म्हणत ओक्साबोक्सी रडताना दिसत आहे. त्याचा हा आक्रोश ऐकून संपूर्ण रुग्णालय परिसर सुन्न झाला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रुग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्न विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नाशिक शहराच्या आडगाव परिसरातील एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये घडली. मेडिकल कॉलेजमधील लिफ्ट अचानक कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ज्योती अहिरे नामक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे कॉलेज आणि रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्योती अहिरे या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. आज कामावर असताना त्या लिफ्टमध्ये काही वस्तू ठेवत होत्या. त्याच वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट अचानक कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ज्योती अहिरे यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

मेडिकल कॉलेज सारख्या गजबजलेल्या ठिकाणी लिफ्ट कोसळल्याची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत एमव्हीपी मेडिकल कॉलेज प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही लिफ्ट नेमकी कशामुळे कोसळली? लिफ्टचे मेंटेनन्स वेळेवर होते का? आणि याला जबाबदार कोण? अशा सर्व अंगांनी तपास केला जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी रुग्णालय परिसरात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होते की तांत्रिक बिघाड झाला, याबाबत तंत्रज्ञांकडूनही माहिती घेतली जात आहे. हा अपघात घडल्यानंतर याची माहिती महिला कर्मचाऱ्याच्या मुलाला देण्यात आली होती. मुलगा जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा महिला लिफ्टमध्येच अडकली होती. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर काहीच मदत करू शकत नव्हते.


शिवाय लिफ्टचा काही भाग बाहेरून तुटलेला दिसत होता. यातून अपघाताची भीषणता लक्षात येत होती. लिफ्टची अशी अवस्था पाहून तरुणाला भावना आवरता आल्या नाहीत. यानंतर तरुणाने मोठ्यानं रडायला सुरुवात केली. "माझ्या आईला मारून टाकलं रे" असं म्हणत तरुण रडत होता. काळीज चिरणारा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओतील दृश्य अत्यंत विचलित करणारी असल्याने न्यूज १८ मराठी याचा व्हिडीओ पब्लिश करत नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group