नाशिक : हळदीच्या कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
नाशिक : हळदीच्या कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)- हळदीच्या कार्यक्रमात व्यवस्थित नाचा, असे सांगितल्याचा राग आल्याने चार युवकांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना अमृतधाम येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अमोल सोमनाथ जगळे (रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) हा तरुण त्याचे मामेभाऊ तन्मय शिरसाठ (रा. विडी कामगारनगर) येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. घरासमोर उभे असताना फिर्यादीच्या ओळखीचे सिद्धांत ऊर्फ भुर्‍या वंजारी हा हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना त्याचा धक्का फिर्यादीला लागला.

फिर्यादीने “जरा व्यवस्थित नाचा,” असे सांगितल्याचा राग आल्याने सिद्धांत वंजारी याने त्याचे मित्र पीयूष खाडे, चिराग गजबे व नितीन मारकर यांना बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. नितीन मारकर याने फिर्यादीला पाठीमागून पकडून ठेवले व सिद्धार्थ ऊर्फ भुर्‍या वंजारी याने त्याच्या कमरेला असलेला लोखंडी कोयता काढून “तुला आता जिवंत सोडत नाही,” असा दम देऊन फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या हेतूने त्याच्या डोक्यात लोखंडी कोयता मारत असताना फिर्यादीने जीव वाचविण्यासाठी हात वर केला असता फिर्यादीच्या उजव्या हाताच्या तर्जनीला कोयत्याचा वार लागल्याने गंभीर जखम झाली आहे.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कंवर करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group