नाशिक : थेट पेशीरचना बदलत कॅन्सरवर केली मात, नामकोत ब्लड कॅन्सरवर कार-टी-सेल थेरपी यशस्वी
नाशिक : थेट पेशीरचना बदलत कॅन्सरवर केली मात, नामकोत ब्लड कॅन्सरवर कार-टी-सेल थेरपी यशस्वी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- चांगल्या रक्तपेशींच्या रचनेत बदल करत त्यांच्याच माध्यमातून कॅन्सरबाधित पेशींना नष्ट करण्याची आव्हानात्मक उपचार पद्धती शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये यशस्वी पार पडली. कार-टी-सेल नावाच्या या उपचार पद्धतीमुळे ब्लड कॅन्सरग्रस्त रुग्णाला जीवदान मिळाले. वैद्यकीय क्षेत्रात ही उपचारपद्धती महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

नामको हॉस्पिटलचे ब्लड कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सिद्धेश कलंत्री व डॉ. नीलेश वासेकर यांच्या टीमने नामको हॉस्पिटलच्या अत्याधुनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागात हे उपचार करत रुग्णाला जीवदान दिले. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला ताप-अंगदुखी अशी लक्षणे होती. उपचार करुनही काही फरक पडत नसल्याने अखेर हा रुग्ण नामको हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. रक्त व इतर तपासण्यांमध्ये त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना डॉक्टरांनी उपचाराची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगत धीर दिला. त्यानंतर तरुणावर उपचार सुरू झाले. मात्र, पारंपरिक उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर डॉ. सिद्धेश कलंत्री व डॉ. नीलेश वासेकर यांच्या टीमने कार-टी-सेल उपचार पद्धतीचा निर्णय घेतला. त्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसून आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नामकोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाखा जहागीरदार यांनी दिली.

पुन्हा उद्भवणार्‍या किंवा उपचारांना प्रतिसाद न देणार्‍या रक्ताच्या कॅन्सरमध्ये कार-टी-सेल उपचार पद्धती जीवनदायी ठरू शकते, हे नामको हॉस्पिटलने सिद्ध केल्याचे डॉ. नीलेश वासेकर यांनी सांगितले. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडली. या रुग्णाच्या उपचारांसाठी नामको ट्रस्ट व मेडीक्लेमद्वारे निधी उभारण्यात आला. उत्तर महाराष्ट्रासह नाशिकमध्ये अशा प्रकारची अत्याधुनिक उपचार यशस्वी होणे, नामको परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. ज्या उद्देशाने नामको हॉस्पिटलची पायाभरणी झाली, त्याची ही परिपूर्ती आहे. यापुढेही नामको विश्‍वस्त मंडळ असे सुपर स्पेशालिटी उपचार सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असेल, अशी प्रतिक्रिया नामको हॉस्पिटलचे सचिव शशिकांत पारख यांनी मनोगत व्यक्त केली.

अशी करतात कार-टी-सेल
कॅन्सरने बाधित पेशी इतर चांगल्या पेशींनाही बाधित करत वेगाने स्वतःची वाढ करत असतात. अशावेळी रुग्णाच्या शरीरातून काही प्रमाणात रक्त काढून त्यातून पेशी वेगळ्या केल्या जातात. प्रयोगशाळेत जनुकीय पद्धतीने या पेशींमध्ये केमेरिक अँटिजेन रिसेप्टर नावाचा विशेष रिसेप्टर टाकला जातो. हा रिसेप्टर कॅन्सर पेशींना ओळखण्यास सक्षम असतो. त्यामुळे प्रयोगशाळेत या पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवून या पेशी पुन्हा शरीरात टाकल्या जातात. शरीरात गेलेल्या या पेशी कॅन्सरने बाधित असलेल्या पेशी ओळखून त्यांच्यावर हल्ला करत नायनाट करतात. त्यामुळेच पारंपरिक केमोथेरपीपेक्षा ही उपचार पद्धती अधिक प्रभावी मानली जाते.


इतर बातम्या
Join Whatsapp Group