नाशिक शहरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून चक्क १९ वर्षीय तरुणीची विक्री केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय ? जाणून घ्या
नेमकं प्रकरण काय ?
शहरात मुलामुलींच्या अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशातच एका प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून सातपूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. शहरातील १९ वर्षीय तरुणीला इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून दोन महिलांनी मालेगावमार्गे जातेगावला नेलं. त्यानंतर तिचं बळजबरी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे तरुणीची सुखरुप सुटका झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
सातपूर पोलिसांनी गांभीर्य ओळखून नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथून या पीडितेची तणावपूर्ण वातावरणातून सुखरूप सुटका केली असून, नाशिकमधील मुली विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. १९ वर्षीय विवाहिता सातपूर परिसरात आईकडे राहते. तिला तीन ते चार महिन्यांचे लहान बाळ आहे. ती पतीपासून वेगळी राहत असल्याचे हेरून याच भागात राहणाऱ्या संशयित राणी आणि भागी नावाच्या दोन महिला एजंटांनी तिच्यावर जाळे टाकले. २७ फेब्रुवारी रोजी “तुला इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांनी तिला इर्टिका कारमध्ये बसवले.
मालेगावमार्गे तिला थेट नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेले. तिथे पोहोचल्यावर या महिलांनी आपला खरा चेहरा दाखवला आणि पीडितेचा नवनाथ खिरड कर नावाच्या तरुणाशी दोन लाख रुपयांत सौदा केला. पीडितेचा आक्रोश आणि विरोध डावलून तिचा बळजबरीने विवाह लावून देण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस कारवाई करत असताना स्थानिकांनी घेराव घातल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण ग्रामीण हद्दीत जाऊन सातपूर पोलिसांनी धडक कारवाई करत तरुणीची सुटका केली आहे. संबंधित महिला व आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. संशयित खिरडकर व इतरांची सखोल चौकशी केली जाणार आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाचे कौतुक केले आहे.