पंचवटीत सराईत गुन्हेगारांचा हैदोस ! तरुणावर प्राणघातक हल्ला
पंचवटीत सराईत गुन्हेगारांचा हैदोस ! तरुणावर प्राणघातक हल्ला
img
वैष्णवी सांगळे
पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात रविवारी रात्री सराईत गुन्हेगारांनी हैदोस घातला. त्यासोबतच एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण थोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं ? 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश नंदू रणमाळे (२९, रा. हनुमानवाडी) हे रविवारी (दि. १५) रात्री उशिरा जेवण करून आपल्या मित्रांसोबत घराशेजारील हनुमान मंदिराजवळ गप्पा मारत उभे होते. यावेळी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर, मयुर निकम, श्रावण पगारे, रुपेश ताजणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ४ ते ५ अनोळखी इसमांनी तेथे धाव घेतली.

यावेळी “तू पोलिसांचा खबऱ्या आहेस,” असे म्हणत आरोपींनी निलेश यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.  प्रसंगावधान राखत निलेशने तिथून पळ काढला. निलेश हातातून निसटल्याने संतप्त झालेल्या पाटणकर टोळीने परिसरात उभी असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक निरीक्षक सतिष शिरसाठ आणि उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हर्षद पाटणकर व त्याच्या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group