राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. आता याच प्रकरणी आता नाशिकमधील मालती आयव्हीएफ (IVF) सेंटरचा संचालक असलेल्या डॉ. अमोल पाटीलला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. काल (3 मार्च) रात्री उशिरा अमोल अतुलला अटक करण्यात आली आहे.
डॉ. अमोल पाटीलवर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे अजून काही सूत्रधार समोर येण्याची दाट शक्यता आहे. अशातच अमोल पाटीलला नाशिक महापालिकाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता मालती आयव्हीएफ सेंटरच्या कागदपत्रची तपासणी होणार असल्याची माहिती आहे.
बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे.