Ashok Kharat: साई संस्थानमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणानं जीवन संपवलं; चार वर्षांपूर्वीचा आरोप, आता खरातला...
Ashok Kharat: साई संस्थानमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणानं जीवन संपवलं; चार वर्षांपूर्वीचा आरोप, आता खरातला...
img
वैष्णवी सांगळे
अशोक खरात प्रकरण राज्यात चर्चेत आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार अशा एक ना एक आरोपांच्या पिंजऱ्यात असलेला अशोक खरात याचा पाय आणखी खोलात जात आहे. दरम्यान यापैकीच एका प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातला दिलासा मिळाला आहे.  कौटुंबिक वाद आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून शिर्डीतील ३७ वर्षीय तरुणाने चार वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.



या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मृताच्या सासऱ्यांसह मेहुणा आणि भोंदू अशोक खरात यांच्यासह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासादरम्यान पुरावे अपुरे ठरल्याने खरातचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विकास रामदास दिवटे (वय ३७, रा. शिर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.तक्रारीनुसार, विकास दिवटे साईसंस्थानमध्ये कार्यरत होते आणि पत्नीशी घरगुती कारणांवरून त्यांचे वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. पत्नी व मुलाशी संपर्क साधण्यासही अडथळे निर्माण केले जात होते, तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे समोर आले होते.

भोंदूबाबा अशोक खरात याचाही सहभाग असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला होता. विकास यांना या बाबाकडे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, त्यानेही त्यांना धमक्या देत त्रास दिल्याचा आरोप होता. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने विकास दिवटे यांनी ९ जून २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना सुसाइड नोटही सापडली होती. या प्रकरणात इतर तिघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, खरातचे नाव पुराव्याअभावी वगळण्यात आले असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group