नाशिकसह 'या' जिल्ह्यांना पावसाने झोडपले ,  शेतकरी हवालदिल;  कुठे मुसळधार तर कुठे गारांचा पाऊस
नाशिकसह 'या' जिल्ह्यांना पावसाने झोडपले , शेतकरी हवालदिल; कुठे मुसळधार तर कुठे गारांचा पाऊस
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील अनेक जिल्हयात पावसाने अचानक एंट्री मारली. यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसाचा थेट फटका काढणीला आलेल्या पिकांना बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पडला आहे. राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली आणि कुठे काय नुकसान झाले याबाबत जाणून घेऊयात.



नाशिक जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पाथरे, मिरगाव, वावी परिसरात विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे पिके आणि फळबांगाचे नुकसान झाले आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यामुळे मिरगाव सध्या चर्चेत आहे. या भागात देखील आज पाऊस कोसळला.

सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव आणि देशवंडी परिसराला आज जोरदार वारा आणि गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला आणि शेतात उभा असलेला कांदा गारांच्या माऱ्यामुळे मातीमोल झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचे पीक जमिनीला टेकले असून, गारांमुळे दाणे गळून पडले आहेत.

जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली असून भारतीय हवामान विभाग ने पुढील 48 तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30 आणि 31 मार्चदरम्यान हवामान अस्थिर राहणार असून 1 एप्रिलला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. 

पुणे शहरासह भोरमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. भोर तालुक्यातील उत्रौली गावाच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यामुळे रस्त्यावर गारांचा सडा पडला होता. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. या पाऊसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली असली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात दुपारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group