उकाड्यानंतर राज्याला दिलासा! आज वादळी पाऊस कोसळणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
उकाड्यानंतर राज्याला दिलासा! आज वादळी पाऊस कोसळणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
img
Nandini khandare More



गेल्या १ महिन्यापासून प्रचंड उकाडा सोसणाऱ्या महाराष्ट्राला आता मात्र काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण राज्यात आज (1 जून) हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार राज्यातील 29 जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.1 जून रोजी महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, तर 6 जिल्ह्यांना धोक्याचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणारे वारे अनुभवास येऊ शकतात. किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वातावरण बदलू शकते. दरम्यान, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील हवामानातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात अलर्ट नसला तरी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात हवामान खात्याने पावसाची शक्यता पुन्हा वर्तवली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींसह मेघगर्जनेची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात आता हवापालट झाल्याचे चित्र आहे. मान्सूनपूर्व पावसाने बहुतांश महाराष्ट्र व्यापला आहे. पुढील काही दिवस ताशी 30-60 किमी वेगाने वारे वाहून विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

इतर बातम्या
Join Whatsapp Group