राज्यात 'कधी ऊन, कधी पाऊस'; १७ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, तर उन्हाचा चटकाही वाढणार!
राज्यात 'कधी ऊन, कधी पाऊस'; १७ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, तर उन्हाचा चटकाही वाढणार!
img
नितीशा कुलकर्णी




कधी उन तर कधी पाऊस माहाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होतांना दिसत आहे. गेल्या काही काळापासून राज्यात उष्णतेची लाट असून वादळी पावसाचं संकट देखील घोंघावत आहे. बुधवारी राज्यातील 26 जिल्ह्यांना सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. आजपासून वादळी पावसाची तीव्रता काहीशी कमी होणार असून उन्हाचे चटके पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तरीही 22 एप्रिल रोजी 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकणात मुख्यत: वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, रायगड परिसरात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपासून पुन्हा या भागाला 48 तासांसाठी यलो अलर्ट असेल. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा यलो अलर्ट कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात वळवाच्या पावसाचं तुफान कायम आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट कायम आहे.

या ठिकाणी पुढील काही दिवस ताशी 30-60 किमीपर्यंत वाऱ्यांचा वेग जाण्याची शक्यता आहे. तसेच विजांसह वादळी पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाड्यात अवकाळीची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल. मात्र, संकट कायम आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट आहे. उष्णतेचा पारा 44 अंशांपर्यंत गेला असून पावसामुळे काही प्रमाणात दिलासा आहे.

मात्र, पुन्हा पारा चढण्याची शक्यता आहे. विदर्भात दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे होरपळून काढणारी उष्णता असून दुसरीकडे वादळी पावसाचं तुफान आहे. आज, 22 एप्रिल रोजी देखील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. विदर्भातील वादळी पावसाचा धोका आजपासून कमी होत असून पुन्हा पारा चढण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर हवामानात मोठे बदल जाणवतील. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरच्या काही भागात यलो अलर्ट असेल. तर उष्णतेची तीव्रता देखील अधिक राहील. एकंदरीत, महाराष्ट्रात 22 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. मात्र, 22 एप्रिलनंतर पावसाचा जोर ओसरत असून पुन्हा उष्णतेची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

इतर बातम्या
Join Whatsapp Group