यंदा १२ वीच्या निकालात विद्यार्थ्यांची टक्केवारी घटल्याचे चित्र आहे. ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ९ टक्क्यांवर आले असून, ६० टक्क्यांवरील मुलांची संख्याही रोडावली आहे. मात्र, या कठीण परिस्थितीतही मुलींनी आपली परंपरा कायम राखत मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. निकालात नेमके काय बदल झाले आणि ५४९ विद्यार्थ्यांचे निकाल का रखडले? जाणून घ्या सविस्तर...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.79 लागला असून दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94 टक्के लागला आहे. तर लातूरचा निकाल सर्वात कमी 84 टक्के लागला. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.68 टक्के लागला आहे. हा निकाल गतवर्षी तुलनेत 2.9% टक्क्यांनी घसरला आहे. सध्या औरंगाबाद विभागातील एकूण 549 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. निकालाचा टक्का घसरल्याने छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष अनिल साबळे महत्त्वाची माहिती दिली आहे.
58 गैरप्रकार
परीक्षा दरम्यान गैरप्रकार झाला होता, यावर बोलताना साबळे म्हणाले की, परीक्षेदरम्यान जवळपास 58 गैरप्रकार आपल्याकडे झाले होते, यापैकी 56 प्रकरणाची आपण चौकशी पूर्ण करून विद्यार्थ्यांवर कारवाई करायची की निकाल जाहीर करायचे याबाबत निर्णय घेतला आहे. 54 प्रकरणात मुलांची त्या विषयातील संपादनूक रद्द केले आहे. दोन प्रकरणात मुले निर्दोष आढळल्यामुळे त्यांचे निकाल जाहीर केले आहेत. विभागात जे दोन मोठे प्रकरण झाले होते, चौसाळा आणि जैतापूर येथील निकाल आपण राखीव ठेवले आहेत, चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे, चौकशी झाली की आपण निर्णय घेणार आहोत. ज्या केंद्रावर गैरप्रकार झाले आहेत त्यांना नोटीस देणार आहोत, सुनावणी घेणार आहोत. प्रकरणानुसार जे केंद्र दोषी आहेत ते रद्द करण्यात येतील.
मुलांच्या टक्केवारीत घट
निकाल दोन टक्क्यांनी घसरण्याचे कारण काय यावर बोलताना साबळे म्हणाले की, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की फिजिक्सचा, गणिताचा गणिताचा पेपर कठीण होता. आपण जे कॉफी मुक्त अभियान राबवत आहोत याचा देखील चांगला परिणाम आपल्याला दिसून येत आहे. प्राविण्यात म्हणजे 75 टक्के पेक्षा अधिक मार्काने येणारी मुले राज्यात फक्त 9.96% एवढे आहेत, 60% च्या वर गुण घेणाऱ्या मुलांची संख्या सुद्धा कमी आहे. निकालाला येणारी सूज, मुलांना जास्त प्रमाणात येणारी टक्केवारी बऱ्यापैकी कमी झाली आहे.
विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
निकालाच्या वैशिष्ट्यांवर बोलताना साबळे म्हणाले की, मुलींना जर आपण संधी दिली तर मुली नेहमीच कशा अग्रेसर राहतात हे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहे. जेव्हा जेव्हा मुलींना संधी मिळते तेव्हा तेव्हा मुलांपेक्षा घरातले काम करून अभ्यास करून मुली चांगल्या पद्धतीने पास होतात. किती विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 501 विद्यार्थ्यांचा निकाल बोर्ड प्रकरणात आणि 48 विद्यार्थ्यांचा निकाल इतर प्रकरणात राखीव ठेवण्यात आला आहे.