४ मे २०२६
नाशिकरोड- पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाने आपल्याच मित्राचा गळा चिरण्याचा आणि पोटात सुरा खुपसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना एकलहरा जवळील राखेच्या खदाणीजवळ घडली. सुदैवाने, पीडित तरुणाने वार हाताने अडवल्याने त्याचे प्राण वाचले असले तरी, या झटापटीत त्याच्या हाताची बोटे गंभीर कापली गेली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभाकर नानाभाऊ साळवे (४१, रा. श्रमिकनगर, ओझर) हे फेब्रिकेशनचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संशयित आरोपी सचिन उर्फ मुरलीधर सिताराम धोंडगे (रा. डोंगरेज, ता. सटाणा) हा त्यांचा मित्र आहे. १ मे रोजी दुपारी सचिनने प्रभाकर यांना फोन करून 'पत्नीला भेटायला एकलहरा येथे जायचे आहे, मला ओझरवरून पिकअप कर' असे सांगितले. मित्राच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रभाकर रात्री ८ वाजता ओझर १० व्या मैलावर पोहोचले.
पाण्यात देव पाहण्यासाठी निर्जनस्थळी नेले
दोघेही दुचाकीवरून (MH 15 JB 4206) एकलहराकडे निघाले. वाटेत सचिनने 'पत्नीचे लफडे सुरू असून तिला रंगेहाथ पकडायचे आहे, आपण शॉर्टकटने जाऊ' असे सांगून प्रभाकर यांना एकलहरा गावाजवळील राखेच्या खदाणीच्या निर्जन रस्त्यावर नेले. रात्री ९:१५ च्या सुमारास सचिनने लघवीचे बहाणा करून गाडी थांबवण्यास सांगितली. रस्ता सामसूम असल्याने प्रभाकर यांनी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करताच सचिनने बॅगेतून धारदार हत्यार काढून थेट प्रभाकर यांच्या गळ्याला लावले.
‘तुझे माझ्या बायकोशी लफडे आहे...’
दुचाकी घसरून दोघे खाली पडल्यानंतर सचिनने आरडाओरडा करत "तुझे माझ्या बायकोशी लफडे आहे, तुला संपवूनच टाकतो" असे म्हणून प्रभाकर यांच्या पोटावर जोरात वार केला. प्रभाकर यांनी प्रसंगावधान राखत तो वार हाताने पकडला, ज्यामध्ये त्यांच्या हाताची बोटे गंभीररीत्या कापली गेली. गंभीर जखमी अवस्थेतही प्रभाकर यांनी तिथून पळ काढला आणि एका वाहनधारकाच्या मदतीने सुरक्षारक्षकांपर्यंत पोहोचले. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रभाकर यांना तातडीने बिटको आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीच्या अटकेसाठी चक्रे फिरवली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Copyright ©2026 Bhramar