पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने राज्य हादरले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली असून, आरोपीला विशेष सरकारी वकील देऊन फाशीची शिक्षा मिळावी यासाठी हायकोर्टाला विनंती करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, गावात जनक्षोभ उसळला असून "नराधमाला आमच्या ताब्यात द्या", अशी मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
या घटनेनंतर आज नरसापूर गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला असून, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.आज (शनिवार) सकाळी गावकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढत नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचे काय करायचे ते बघू असे म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला. या प्रकरणामुळे गावातील वातावरण तापले असून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “पुणे जिल्ह्यातील (Pune District) घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असून, नराधमाला अटक झाली आहे. आरोपीचे अशाप्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेतून समाजातून मोठा रोष आहे. सर्वांना या घटनेमुळे पीडित मुलीच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटत आहे. आरोपीला अटक केली असून, मी आश्वस्त करू इच्छितो की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करण्यासाठी हायकोर्टाला विनंती करू. विशेष सरकारी वकील देऊन आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करणार आहोत” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
विरोधकांना प्रत्युत्तर
या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतांना महाराष्ट्रात महिला (Women) असुरक्षित असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे अत्यंत असंवेदनशील असून, प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणं, यापेक्षा वाईट काही असू शकत नाही. काही गोष्टीत संवेदनशीलता पाळली पाहिजे. राज्य सरकारने (State Government) जे करणं अपेक्षित आहे, ते नक्की करणार”, असे त्यांनी म्हटले.