राज्यातील घडामोडींना वेग आला असून सध्या राज्यात पुन्हा एकदा ,मराठा आरक्षणावरून हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याच दरम्यान आता मराठा तरुणांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी आनंदवार्ता दिली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी ही मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यास मदत होईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विविध योजना राबवते. त्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षात फडणवीस सरकारने 750 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. त्यापैकी 300 कोटींचा निधी वर्गही करण्यात आला होता. त्याविषयीचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला होता. आता नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
आता नियोजन विभागाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. सदरचा निधी खर्च करताना राज्य शासनाची कार्यनियमावली, वित्तीय नियमावली, अटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा खर्च करताना कोणतीही अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 29 ऑगस्ट 1998 रोजी करण्यात आली होती. महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी 20 टक्के, 30 टक्के, 40 टक्के आणि 50 टक्के अशा प्रकारे निधी वितरीत करण्यात येतो. हा निधी खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाला दिल्या जाते. त्यानंतर पुढील निधीची तरतूद करण्यात येते. स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला गती देणाऱ्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राबवते. त्यासाठी राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात येतो. या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2017 मध्ये वाढवून 6 लाख आणि पुढे 8 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 30 मे 2026 रोजीपासून हे उपोषण करण्यात येणार आहे. याविषयीची बैठक अंतरवाली सराटीत झाली आणि नंतर त्यांनी हा इशारा दिला. सरकार आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींच्या निधीची अपडेट दिली आहे.