पुत्राच्या विजयानंतर आता पित्यालाही दिलासा! भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना जामीन मंजूर
पुत्राच्या विजयानंतर आता पित्यालाही दिलासा! भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना जामीन मंजूर
img
नितीशा कुलकर्णी






नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बहुचर्चित नांदूर नाका राडा आणि खून प्रकरणातील संशयित भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना मुंबई हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. २२ ऑगस्ट रोजी झालेल्या राड्याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल होता. गेल्या सात महिन्यांपासून कारागृहात असलेल्या निमसेंना आता दिलासा मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या गुन्ह्यातील सुमारे १५ संशयितांना आतापर्यंत जिल्हा व उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, निमसे यांचाही आता कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जर्नादन नगर भागात २२ ऑगस्ट रोजी निमसे आणि धोत्रे यांच्या गटात जोरदार राडा झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हल्ल्यात राहुल संजय धोत्रे व अजय दत्तू कुसाळकर हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान २९ सप्टेंबर रोजी राहुल धोत्रे याचा मृत्यू झाला आणि या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले होते.

आकाश राजू धोत्रे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणात सुमारे २५ संशयितांचा समावेश आहे. यात माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांच्यासह पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्निल बागुल, सुधीर उर्फ गोटीराम निमसे, अक्षय पगार, मेघराज जोजारे, गणेश निमसे, रोशन जगताप, सुमित हांडोरे व इतरांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना तत्काळ अटक केली होती, तर उद्धव निमसे १५ ऑक्टोबर रोजी पोलिसांना शरण आले होते. यापूर्वी जानेवारी महिन्यात नामदेव मते व सचिन दिंडे यांना जामीन मिळाला होता. तसेच गेल्या आठवड्यात स्वप्निल बागूल, गणेश गिते, अक्षय पगार, संतोष मते, किरण शिंदे, बाळा उर्फ भूपेश गायकवाड आणि सुधीर निमसे यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

राजकीय पार्श्वभूमी

दरम्यान, उद्धव निमसे यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज केला होता, मात्र जामीन मिळत नसल्याने त्यांच्या जागी त्यांचे पुत्र रिद्धिश निमसे यांनी निवडणूक लढवली. रिद्धिश निमसे हे निवडणुकीत विजयी झाले असून, तेव्हापासून उद्धव निमसे यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर मंगळवारी उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group