नोकरीची सुवर्णसंधी: कृषी पदवीधरांना मिळणार प्राधान्य; 'शेतकरी मित्र' योजनेतून हजारो तरुणांना रोजगार!
नोकरीची सुवर्णसंधी: कृषी पदवीधरांना मिळणार प्राधान्य; 'शेतकरी मित्र' योजनेतून हजारो तरुणांना रोजगार!
img
नितीशा कुलकर्णी







राज्यातील कृषी पदवीधरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कृषी विभाग अधिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, या भरती प्रक्रियेत कृषी पदवीधरांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो कृषी पदवीधरांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

कृषी पदवीधरांना अग्रक्रम देण्याची मागणी

अॅग्रीकॉस संघटनेचे अध्यक्ष आनंद चोंदे पाटील यांनी सोमवारी कृषी आयुक्तालयात कृषिमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी ‘शेतकरी मित्र’ भरती प्रक्रियेत कृषी पदवीधरांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. राज्यात मोठ्या प्रमाणात कृषी पदवीधर बेरोजगार असून, त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली होती.

राज्यभरात ११ हजारांहून अधिक पदे भरणार

राज्यातील प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत एक ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा प्रस्ताव आहे. या अंतर्गत तब्बल ११ हजार ५८७ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरमहा मिळणार १८ हजार रुपये मानधन

संबंधित पदांसाठी उमेदवारांना दरमहा सुमारे १८ हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, कृषी पदवीधरांनी या भरतीसाठी आतापासूनच तयारी सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group