महाराष्ट्रात उष्णतेचा धोका वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठीकाणी तर हिट वेव्हची स्थिती निर्माण झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. घामाच्या धारांनी जीव लाहीलाही होत आहे. महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
27 आणि 28 एप्रिल रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला. 27 एप्रिल रोजी नागपूर येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज 28 एप्रिल रोजीही तापमान 45 अंशांवर आहे. अमरावती येथे 27 एप्रिल रोजी 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 28 एप्रिल रोजीही तापमान 46 अंशांवर स्थिर आहे. येथे उष्णतेची लाट कायम आहे.
अकोला येथे 27 एप्रिल रोजी 46.03 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर 28 एप्रिल रोजी 45 अंश तापमान आहे. येथेही हिट वेव्हचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वर्धा येथे 27 एप्रिल रोजी 46.05 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर 28 एप्रिल रोजी तापमान तब्बल 47 अंशांवर पोहोचले आहे. येथे उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. गोंदिया येथे 27 एप्रिल रोजी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर 28 एप्रिल रोजी तेवढेच तापमान आहे.
त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे. बुलढाणा येथे 27 एप्रिल रोजी 43.06 अंश सेल्सिअस तापमान होते, तर 28 एप्रिल रोजी ते 44 अंशांवर आहे. चंद्रपूर येथे 27 एप्रिल रोजी 45.02 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर 28 एप्रिल रोजी ते 44.30 अंश तापमान आहे . यवतमाळ येथे 27 एप्रिल रोजी 45.02 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर 28 एप्रिल रोजी तापमान 45.30 अंशांपर्यंत पोहोचले. येथेही हिट वेव्हची स्थिती कायम आहे.
एकूणच विदर्भातील बहुतांश भागात तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.