मे महिन्यात उन्हाच्या झळांपासुन दिलासा! सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज, मान्सूनच्या आगमनाचीही तारीख ठरली
मे महिन्यात उन्हाच्या झळांपासुन दिलासा! सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज, मान्सूनच्या आगमनाचीही तारीख ठरली
img
नितीशा कुलकर्णी





कडाक्याच्या उन्हात होरपळणाऱ्या लोकांसाठी पावसाची आनंदाची बातमी आहे. मे महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून, अंदमानमध्ये मान्सूनचे आगमन १४ ते १६ मे दरम्यान होण्याची चिन्हे आहेत. पावसाच्या या सरींमुळे उष्णतेची तीव्रता कमी होणार असली, तरी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मात्र काही दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका कायम राहणार आहे.

एप्रिल महिन्यात देशभरात जाणवलेल्या तीव्र उष्णतेनंतर मे महिन्यात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मासिक अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही प्रदेशांमध्ये उष्णतेची लाट कायम राहू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

तापमानाचा अंदाज काय?

आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात तापमानाचे स्वरूप मिश्र राहणार आहे. देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्य किंवा किंचित कमी राहील. दक्षिण, ईशान्य आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान (रात्रीचे) बहुतांश भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे. यामुळे दिवसा उष्णता कमी जाणवली तरी रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

उष्णतेच्या लाटेचा धोका कायम

हवामान विभागाने काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेषतः हिमालयाच्या पायथ्याशी असलेले भाग, पूर्व किनारपट्टीवरील राज्ये, गुजरात आणि महाराष्ट्र या भागांमध्ये काही दिवस तापमानात झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रात्रीच्या तापमानात बदल

मे महिन्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे रात्रीच्या तापमानात होणारी वाढ. अनेक शहरांमध्ये रात्रीही उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. मात्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे त्या भागांमध्ये रात्री गारवा अनुभवता येईल. 3)पावसाचा अंदाज आणि त्याचे परिणाम आयएमडीच्या अंदाजानुसार, मे महिन्यात देशातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. सरासरीच्या सुमारे ११०% (६१.४ मिमी) पाऊस पडू शकतो. मात्र, पूर्व, ईशान्य आणि पूर्व-मध्य भारतात पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. यामुळे काही भागांमध्ये कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे उष्णतेत दिलासा मिळेल.

वीज वापरात वाढ

एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे देशभरात वीज वापरात सुमारे 4% वाढ झाली आहे. एसी, कूलर आणि पंख्यांचा वाढलेला वापर यामागील मुख्य कारण मानले जात आहे. जर उष्णता कायम राहिली, तर मे महिन्यातही वीज वापर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

मान्सून कधी सक्रिय होणार?

हवामान विभागाने नैऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे. अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून १४ ते १६ मे दरम्यान दाखल होऊ शकतो साधारणपणे २० मेपर्यंत तो अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच, हवामान मॉडेल्सनुसार एल निनो स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो.

इतर बातम्या
Join Whatsapp Group