देशातील अनेक राज्ये उष्णतेच्या लाटांनी होरपळत आहेत. येत्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांतील तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दिल्ली -एनसीआरमध्ये बुधवारपासून उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कडाक्याच्या उन्हातही २० राज्यांमध्ये आज, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही हवामान खात्यानं अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश यांसह अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याचं तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. राजस्थानच्या सहा जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत वादळी वाऱ्याचा अंदाज
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या राज्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील २० राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या काही भागांत गारपीटीची शक्यता आहे.
बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही जिल्ह्यांत हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आसाम, मणिपूर, मेघालयातील काही जिल्ह्यांत पाच दिवस पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.