दैनिक भ्रमर : जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे गावातील स्वप्नील सुभाष सोनवणे (वय ३९) हे पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. स्वप्नील सोनवणे हे भारतीय सीमा सुरक्षा सैन्य दलातील ५७ बटालियनमध्ये जी. डी. कॉन्स्टेबलपदावर कार्यरत होते. २०१४ मध्ये भारतीय सैन्य सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती झाले होते.
स्वप्नील सोनवणे यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना तसेच गावकऱ्यांना समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. तर रक्षाबंधनाच्या दिवशीच स्वप्नील सोनवणे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या बहिणीला रडू आवरत नव्हते. दरम्यान स्वप्नील यांचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक पश्र्चिम बंगालमध्ये रवाना झाले आहेत. त्यांचे पार्थिव बीएसएफ ५७ बटालियनचे जवान घेऊन विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर येणार आहेत. यानंतर मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.