न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना काल निवृत्त झाले. आता आज (14 मे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ आजपासून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजेच सहा महिने दहा दिवसांचा असणार आहे.
न्यायाधीश भूषण गवई यांची कारकीर्द
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. भूषण गवई यांनी 16 मार्च 1985 रोजी वकिली सुरू केली. 1990 नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर भूषण गवई यांनी वकिली केली. 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा ते भाग होते ज्यांनी ऐतिहासिक निकाल दिले आहेत.
भूषण गवई होते कलम 370 रद्द करणाऱ्या खंडपीठाचा भाग
कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचा भूषण गवई भाग होते. 2016 च्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही ते सदस्य होते. निवडणूक देणग्यांसाठी इलेक्टोरल बाँड योजना रद्द करण्याचा निर्णय देणाऱ्या खंडपीठाचाही भूषण गवई हे भाग होते.