महत्वाची बातमी : कोकण, विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात ‘जोर’धार ; पुढील दोन दिवस पावसाचा अलर्ट
महत्वाची बातमी : कोकण, विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात ‘जोर’धार ; पुढील दोन दिवस पावसाचा अलर्ट
img
Dipali Ghadwaje
राज्यात  आज आणि उद्या विविध ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाशिकसह बहुतांश जिल्ह्यात 5 आणि 6 एप्रिल रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दिवसांत मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावील अशी शक्यता आहे.

मराठवाड्याला गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने चांगलच झोडपलं. विभागात ठिकठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर बीड जिल्ह्यात एक शेतकरी आणि बैल तर सिल्लोड तालुक्यात वीज कोसळून एक गाय ठार झाल्याची घटना घडली.

गंगापूर शहरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी, येसगाव येथे गारपीट झाली. जालना जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, पारध, वालसावंगी, वडोद तांगडा परिसरात गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून पारध गावात पिके आडवी पडली आहेत. 

लातूर जिल्ह्यात लातूर, रेणापूर तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.  बीड, धाराशीव, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पाऊस झाला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group