सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार सरी बरसत असताना काही जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा लोक पाहत आहे. पुढील २४ तासांत काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर वगळता संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोरदार वाऱ्यांसह समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून, किनारपट्टी भागातील नागरिकांनीही सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांचाही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे आज टाळा.