राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी २६ आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट) लावला आहे. बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी त्यांचेच पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यात संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा समावेश आहे.
आता याच हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये थेट सहभाग असल्याचा हवाला देत विशेष मकोका न्यायालयाने आरोपी रफीक शेख याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
यावेळी न्यायालयाने सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांकडे लक्ष वेधलं. ज्यात जप्त केलेला दारूगोळा, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सह-आरोपींच्या कबुलीजबाबांचा समावेश आहे. यातून शेखचा संघटित गुन्हेगारी टोळीतील सक्रिय सहभाग अधोरेखित होतो.
सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले, “सहआरोपी मोहल आणि शिवकुमार गौतम यांच्या कबुलीजबाबामुळे प्रथमदर्शनी असं दिसून येतं की, आरोपीने जाणीवपूर्वक टोळीप्रमुख अनमोल बिष्णोई याला हत्येची सोय करण्यासाठी मदत केली आणि आपली सेवा दिली.
प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाने याला दुजोरा दिला आहे. अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जामिनावर सुटका झाल्यास त्याच्याकडून पुन्हा गुन्हा होण्याची शक्यता आहे.” आरोपपत्रात सीडीआरमध्ये प्रथमदर्शनी शेख आणि सहआरोपी यांच्यातील संभाषणं दिसून येत असल्याचंही न्यायालयाने यावेळी नमूद केलं. एका सहआरोपीच्या कबुलीजबाबानुसार, रफीक शेखला आर्थिक लाभ मिळालं होतं.