कबुतरखान्यांमुळे श्वसनाचे आजार बळावत असल्यामुळे हे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणीही कबुतरखान्याच्या ठिकाणी खाद्यं टाकू नये, असं मुंबई महापालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यास पाचशे रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे.
शनिवारी कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. माहीम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही दादरच्या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला पालिकेला देण्यात आले होते.
हे ही वाचा...
दादरमधील स्थानिक मात्र या कबुतरखान्यावरील कारवाईला तीव्र विरोध करत आहेत. याशिवाय, काही पक्षीप्रेमींनी कबुतरखाना हटवण्यास पूर्ण विरोध केला आहे. दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री मुंबई महानगरपालिकेचे पथक आले होते. मात्र, त्यावेळी याठिकाणी जमाव जमला आणि त्यांनी तोडकामाला विरोध केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात होता. या बंदोबस्तात कबुतरखान्याच्या भागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा...
कबुतरांमुळे कोणालाही काहीही त्रास होत नाही. या भागातील बिल्डर्सची घरं विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.