2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला होता. 21 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणात 2015 मध्ये ट्रायल कोर्टाने 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती दिली आहे.कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की जे आरोपी या प्रकरणात पूर्वीच निर्दोष ठरवले गेले आहेत आणि आता जामिनावर किंवा मुक्त झाले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार नाही. सध्या या प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित सर्व पक्षकारांना नोटीस बजावून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.