बीडमध्ये रक्षकच भक्षक झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस खात्याला काळिमा फासण्याचं काम बीडच्या एका पोलीस अधिकाऱ्याने केले आहे. विवाहित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2013 पासून बीड पोलिस दलात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदेची ओळख विवाहितेशी झाली ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर शिंदेने पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करत स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. बीडहून धाराशिवला बदली झाल्यावरही त्याने वारंवार पिस्तुलाच्या धाकावर अत्याचार केला, शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेने धाराशिव येथे सोबत राहण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपीस अद्याप अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रक्षकच भक्षक बनणार असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.