बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका माजी सरपंचाने तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले असून, शेत रस्त्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी माजी सरपंचावर कारवाई करत न्यायालयात हजर केलं आहे.
गोरख काशीद असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते साक्षाळ पिंपरी गावाचा माजी सरपंच आहे. तर, प्रकाश काशीद असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेत रस्त्याच्या वादातून प्रकाश आणि गोरख यांच्यात वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी वाद विकोपाला गेला. यानंतर गोरख यांना राग अनावर झाला. त्यांनी प्रकाश याच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केला
रक्तबंबाळ झाल्यानंतर प्रकाश खाली कोसळला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर माजी सरपंचाविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरूवात केली. त्यांनी माजी सरपंच गोरख काशीद याला अटक केली.गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.