सख्खा भाऊ पक्का वैरी अनेक उदाहरणे समोर असताना जालना तालुक्यातील पानशेंद्रा गावातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भावानेच भावाची हत्या केल्याने एकप्रकारे नात्यालाच काळिमा फासला गेला आहे.
३२ वर्षीय सचिन सुधाकर पाचरणे यांची त्यांच्या २२ वर्षीय लहान भावाने हत्या केली आहे. शेतीच्या वादातून ही हत्या झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार सचिन पाचरणे याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे तो नेहमी शेतीच्या वाटणीचा विषय काढायचा. शिवाय त्यातून नियमित वाद व्हायचे. मोठ्या भावाच्या या वर्तवणुकीमुळे छोटा भाऊ दत्ता हा वैतागला होता. यातून वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहाला कंटाळून या दोघांचे वडील सुधाकर पाचरणे यांनी जवळच्या नातेवाईकांना पानशेंद्रा या गावी बोलावून मिटिंग घेतली.
कुटुंबीयांच्या समन्वयातून दोनही भावांना शेतीची वाटणी करून देण्यात आली. मात्र वाटणी पत्रासाठी सचिन हा रजिस्ट्री कार्यालयात आलाच नाही. त्यानंतर त्याने दारू पिऊन लहान भाऊ दत्ता याच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी मोठा भाऊ सचिन याने लहान भावाला मारण्यासाठी लाकडी दंडा आणला. झटापटीत लहान भाऊ दत्ता याने तो लाकडी दांडा हिसकावून घेत मोठ्या भावाला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता पाचारणे यास तात्काळ अटक केली आहे.