मुरादाबाद (भ्रमर वृत्तसेवा) :- माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्याच बहिणीची निर्घृण हत्या केली.
आरोपी हार्दिकने आपली सख्खी बहीण हिमशिखा हिच्यावर एकामागून एक तब्बल 40 वेळा वार केले आणि त्यानंतर आपल्या आईलाही सोडले नाही.
हार्दिकच्या हल्ल्यात त्याची आई गंभीर जखमी झाली असून, सध्या आईवर उपचार सुरू आहेत. या हत्येमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे ते ऐकून उत्तर प्रदेश पोलिसांच्या पायाखालची जमीनही सरकली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकचे पुण्यातील एका मुलीसोबत इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. 7-8 महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. आपल्या आई आणि बहिणीने मिळून हे नाते तोडल्याचा संशय हार्दिकला होता. याच रागातून त्याने बहिणीवर 40 वार केले, त्यानंतर आईलाही सोडले नाही.
पुण्यातील मुलीसोबत ब्रेकअपनंतर हार्दिक नैराश्यात होता. हार्दिक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याने नोकरी सोडून युट्युबर म्हणून करिअर करण्याचा प्रयत्न केला होता. घरचे लोक त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याला ते हस्तक्षेप वाटत होते. त्यातच त्याचे ब्रेकअप झाले. हार्दिकने आई आणि बहिणीवर हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला. 6 मार्च रोजी आई कामावर असताना त्याने बहिणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करून तिची हत्या केली. त्यानंतर आईला सरप्राईज देण्याच्या बहाण्याने ऑफिसमधून घरी बोलावले आणि त्यांच्यावरही हल्ला केला.