कर्नाटच्या हुबळीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसाढवळ्या निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. आरोपी आणि पीडिता एकाच महाविद्यालयात शिकत होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फयाज (वय २३) नामक आरोपीने २१ वर्षीय नेहा हिरेमठचा खून केला. आरोपी बेळगाव जिल्ह्यातला असून त्याचे कृत्य महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. नेहाचा पाठलाग करून फयाजने तिची हत्या केली आणि त्यांतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तात्काळ पकडण्यात आले. पोलिस सध्या या घटनेमागचा हेतू तपासत आहेत.
नेहा हिरेमठ हुबळीच्या केएलई टेक्नोलॉजिकल विद्यापीठात एमसीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. हत्या झाल्यानंतर नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.