'डॉक्टर डेथ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे . दिल्ली पोलिसांनी ५० हून अधिक हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. देवेंद्र शर्मा उर्फ 'डॉक्टर डेथ'ला अटक केली. हा देवेंद्र शर्मा हा कुणी डॉक्टर नाही तर तो कु्ख्यात गुन्हेगार आहे. आयुर्वेदिक डॉक्टर आणि सीरियल किलर बनलेला देवेंद्र शर्मा गेल्या वर्षी पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता.

गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील बांदिकुई शहरात तो बाबा म्हणून राहत होता. आपले भूतकाळातील गुन्हे लपविण्यासाठी आणि ओळख पटू नये म्हणून त्याने 'दयादास महाराज' या नावाने स्वतःची ओळख निर्माण केली आणि एक मंदिर बांधले. तो संताच्या वेषात होता आणि आध्यात्मिक गुरू म्हणून सगळीकडे मिरवत होता. ऐवढंच नाही तर या ठिकाणी तो लोकांवर उपचार करण्याचे नाटक करत होता.
देवेंद्र शर्मा हा काही सामान्य गुन्हेगार नाही. त्याने ५० जणांची हत्या केली आणि १२५ किडनी प्रत्यारोपण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा आतापर्यंत ५० हून अधिक हत्या प्रकरणात सहभागी आहे. तो हत्या करायचा आणि त्यांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील कासगंज येथील हजारा कालव्यात फेकून द्यायचा. यामागचा त्याच उद्देश एकच होता की हे मृतदेह मगरी खातील आणि पुरावे कायमचे नष्ट होतील.
देवेंद्र शर्माकडे आयुर्वेद पदवी होती आणि त्याने वैद्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण १९९४ मध्ये एका गॅस एजन्सी करारात त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. तिथूनच त्याच्या आयुष्याला गुन्हेगारी वळण मिळाले.
त्याने बनावट गॅस एजन्सी चालवायला सुरुवात केली आणि हळूहळू तो किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा भाग बनला. १९९८ ते २००४ पर्यंत देवेंद्र शर्माने देशाच्या विविध भागात १२५ हून अधिक बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण केले. यामध्ये अनेक डॉक्टर आणि दलाल सहभागी होते. पैशाच्या लोभापायी त्याने १२ हून अधिक गरीब लोकांच्या किडन्या विकल्या.
२००२ ते २००४ दरम्यान देवेंद्र शर्माने एक नवीन गुन्हेगारी पद्धत शोधून काढली. तो त्याच्या साथीदारांसह टॅक्सी आणि ट्रक चालकांना बनावट ट्रिपसाठी बोलावायचा. वाटेत तो त्यांची क्रूपपणे हत्या करायचा आणि त्यांची वाहने राखाडी बाजारात विकायचा.
त्यानंतर मृतदेह हजारा कालव्यात मगरींना खाण्यासाठी फेकायचा. २००४ मध्ये देवेंद्र शर्माला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये सात वेगवेगळ्या हत्येप्रकरणी गुन्हे दाखल होते. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका प्रकरणात गुरुग्राम न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली होती.
२०२३ मध्ये देवेंद्र शर्माला पुन्हा एकदा पॅरोलवर सोडण्यात आले. पण ३ ऑगस्ट रोजी त्याचा पॅरोल संपल्यानंतर देखील तो तुरुंगात परतला नाही. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा त्याचा शोध घेतली होती. सहा महिने चाललेल्या शोध मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने अलीगढ, जयपूर, दिल्ली, आग्रा आणि प्रयागराजपर्यंत त्याचा शोध घेतला. शेवटी त्याला राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील एका आश्रमातून अटक करण्यात आली जिथे तो लोकांना बाबा म्हणून उपदेश करत होता. लोकं देखील मोठ्या संख्येने त्यांच्याकडे यायची. या डॉक्टर डेथने पोलिसांनाही चक्रावून सोडलं.