तब्बल पाच वर्षांनंतर लागला अपहृत मुलीचा शोध, आरोपीस अटक
तब्बल पाच वर्षांनंतर लागला अपहृत मुलीचा शोध, आरोपीस अटक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तांत्रिक विश्‍लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने तब्बल पाच वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गिरड येथून अपहृत अल्पवयीन मुलगी व तिला पळवून नेणारा किरण नामदेव जाधव (वय 27, रा. गिरड) यांना ताब्यात घेऊन सातपूर
पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी, की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीतील अपहरण झालेली मुले व मुली व बेपत्ता महिलांचा शोध घेण्याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेअंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षास आदेश दिले आहेत.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनानुसार या कक्षाचे कर्मचारी समांतर तपास करीत असताना सातपूर पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची नोंद मिळाली. ही मुलगी शोधण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध होत नव्हता; मात्र तांत्रिक विश्‍लेषणातून अपहृत मुलगी गिरड येथे असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना समजले.

त्यानुसार प्रवीण माळी यांच्यासह हवालदार गणेश वाघ, चालक पोलीस हवालदार दीपक पाटील व महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली घरटे यांच्या पथकाने गिरड येथे जाऊन मानवी कौशल्याचा वापर करून अपहृत मुलीचा शोध घेतला. या मुलीसह आरोपीही सापडल्यामुळे दोघांनाही ताब्यात घेऊन नाशिकला आणण्यात आले व सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या यशाबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, हवालदार गणेश वाघ, चालक पोलीस हवालदार दीपक पाटील, महिला कॉन्स्टेबल वैशाली घरटे, तांत्रिक विश्‍लेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, हवालदार विशाल साबळे व कॉन्स्टेबल गणेश रुमाले यांचे अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group